
आदरणीय समाजसेवक श्री.अण्णा हजारे
पद्मभूषण आदरणीय समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी या ठिकाणी घेण्याचा सुंदर योग आला. या भेटीच्या निमित्ताने राळेगणसिद्धी या ठिकाणी आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाने व अण्णांच्या माध्यमातून गेल्या पाच दशकात उभे राहिलेले सामाजिक कार्य व लोकसहभागातून व लोकश्रमातून साकारलेले एक समृद्ध गाव अनुभवता आले. येथील पर्यावरणपूरक विवध प्रकल्प आम्ही प्रत्यक्ष पाहिले व त्या प्रकल्पांचे महत्व समजुन घेतले. राळेगणसिद्धी हे गाव पाहताना निरपेक्षपणे लोककल्याणाची पावन भावना ठेवुन कार्य करणारी आदरणीय आण्णांसारखी एक व्यक्ती जरी गावाला लाभली तरी त्या गावाचे भाग्य उजळून जाते याचा प्रत्यय येतो. गावाला प्रगतीची, वैभवाची व समृद्धीची सिद्धी प्राप्त होते.
आदरणीय अण्णांना वृक्षदायी प्रतिष्ठानचा सर्व प्रवास या प्रसंगी सांगितला. आदरणीय अण्णांनी मनापासून या पर्यावरणपूरक कार्याचे कौतुक केले. या सेवाकार्यास सदिच्छा व आशीर्वाद दिले. आज वृक्षारोपण व वृक्ष संगोपन ही काळाची नितांत गरज आहे, असे सांगत त्यांनी या सामाजिक कार्यात काम करताना एक मोलाचा संदेश आम्हाला दिला. आदरणीय अण्णा म्हणाले, “सामाजिक कार्य करीत असताना अनेकदा नैराश्य येत असते आणि असे नैराश्य हा देखील मानवी जीवनाला चिकटलेला एक रोगच आहे. निराशा आपल्या मानवी स्वभावातील सर्वात मोठा दोष आहे. सामाजिक कार्य करीत असताना यश अपयशाचा विचार न करता आपण आपले कर्म अतिशय मनापासून करीत जावे. चांगल्या कामाच्या मागे साक्षात परमेश्वराचे आशीर्वाद असतात. त्यामुळे सामाजिक कार्य करीत असताना अडचणी, समस्या व संकटे येत असतात. त्यावेळी निराश न होता आपल्या शुद्ध हेतूवर व परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवून आपण आपले काम निरपेक्षपणे करीत जावे यातच जीवनाचे सार्थक आहे.”
आदरणीय अण्णा आज नव्वद वर्षांचे आहेत. पण या नव्वदाव्या वर्षी देखील त्यांच्या मनातील समाजसेवेची व देशभक्तीची तळमळ पाहून मन भारावून जाते. शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेसाठी व देशभक्तीसाठी हा देह चंदनाप्रमाणे झिजत राहावा हाच त्यांच्या जीवनाचा एकमेव उद्देश आहे. वृक्षदाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीक्षेत्र देहू गावामध्ये साकारले जाणारे ‘जगद्गुरु अभंग गाथावन‘ या वनात भेट देऊन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यास आदरणीय अण्णांनी संमती दर्शवली व या कार्यासाठी मनापासून आनंद व्यक्त केला. जीवनातील ही ग्रेट भेट भविष्यकाळात पर्यावरणपूरक कार्यासाठी, लोकसेवेसाठी नित्य प्रेरणादायी व दिशादर्शक ठरणार आहे.
