मध्ययुगीन संतांच्या कालखंडा मध्ये परकीय आक्रमणानंतर एकंदरीत समाज जातिभेद, पंथभेद, वर्णभेद, वंशभेदाच्या भिंतीत बंदिस्त झाला होता. सर्व समाजा मध्ये अंधश्रद्धा बोकाळली होती. कर्म कांडाला उधाण आले होते. सर्व समाज असंघटित होता. रस्त्यावर माता भगिनी सुरक्षित नव्हत्या, परस्परांमध्ये घृणा व तुच्छतेची भावना होती, तिरस्काराची दृष्टी होती. आचार, विचार आणि व्यवहार यात भिन्नता होती. लोकजीवन अवनतीच्या घोर अंध:कारात बुडाले होते. बहुजन समाजाला नामस्मरण व भक्तीचा अधिकार नाकारला होता. समाजामध्ये स्वधर्माविषयी ग्लानी आलेली होती. अशा भयनीय अवस्थेत….
बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥
या जाणिवेतून या दयनीय अवस्थेतून सर्व समाजाला एका समान सूत्रात बांधण्याची व सर्वांमध्ये आपापसात सामंजस्य व सद्भाव स्थापित करण्याची गरज होती. आणि तेच नेमकं काम या मध्ययुगीन संतांनी केलेलं आहे.. या अपमानित समाजाला स्वाभिमानाने पूर्ण मर्यादेने जगण्याचे नैतिक बळ या मध्य युगीन सकल संतांनी दिलं.
पण ? कलियुगामध्ये… आता मानवाला जगण्यासाठी बळ कुठून मिळणार ? जगण्या साठी स्वच्छ मुबलक प्राणवायू कुठे मिळणार ? यांनी तर प्राणवायू देणाऱ्या या नैसर्गिक कारखान्यांची (स्वदेशी वृक्षांची) तर औद्योगिक कारखान्यांसाठी राजरोसपणे कत्तल केली.
मध्ययुगामध्ये मनुष्याला जगण्याचे सामर्थ्य ज्याप्रमाणे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या मध्य युगीन संतांनी दिले. तद्वत या कलियुगा मध्ये देखिल मनुष्याला जगण्याचे सामर्थ्य हे संत रुपी वृक्षच देतील. मग चला तर ! आपण… हरित पालखी महामार्ग अभियानामध्ये सामील होऊन या संत विचारांची वाट हरित करून निरोगी निरामय आयुष्य जगण्यासाठी ? पिंपळ, वड, कडूलिंब, नांद्रुक, या दैवी वृक्षांची लागवड करून संतरुपी वृक्षांची सेवा करूया ……!