पिंपळवनात वृक्षारोपण

रविवार, दि.१९ जानेवारी २०२५. पौष व. १२ शके १९४६.
वृक्षदाई प्रतिष्ठाण या संस्थेच्या वतीने सातत्याने वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाचे कार्य होत असते. या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींना सामावून घेणे या उपक्रमाविषयी लोक मनात जागृती निर्माण करणे हे कार्य अखंडपणे या संस्थेकडून सुरू आहे. आज संत साहित्याचे अभ्यासक, लेखक, विचारवंत वैकुंठवासी डॉ.रामचंद्र देखणे सर यांचे सुपुत्र संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांच्या हस्ते देहूतील पिंपळवनात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.भावार्थ देखणे यांनी संत गाडगेबाबांचा अतिशय सुंदर दृष्टांत सांगितला. संत गाडगेबाबा ज्या गावांमध्ये कीर्तनाला जात असे त्या गावात ज्या ठिकाणी कीर्तन होणार आहे त्या ठिकाणी अगोदर ते स्वतः झाडूने ती जागा स्वच्छ करीत असत व त्यानंतर तेथे कीर्तनाला उभे राहत असत. अगदी त्याच पद्धतीने श्री क्षेत्र देहू मध्ये आल्यानंतर वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे संत तुकोबारायांचे अभंग वचन प्रत्यक्ष जीवन आचरणात आणून कीर्तनाला जाण्यापूर्वी वृक्षारोपन करून जावे अशीच एक सुंदर रित वृक्षदाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त श्री.शिवाजी महाराज मोरे यांनी आज मला दाखवून दिली.खरंच हे मी माझे भाग्य समजतो संतांच्या कृपाशीर्वादातून अशा सेवाभावी उपक्रमात सहभागी होता येत आहे.
या पुढील काळात देखील कीर्तन प्रवचनातून पर्यावरण जागृती व निसर्गाशी माणसाचे नाते कसे जिव्हाळ्याचे, आपुलकीचे व अत्यंत स्नेहाचे होईल यासाठी मी देखील प्रयत्नशील असेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या वृक्षारोपनानंतर त्यांची कीर्तनसेवा देहूतील गाथा मंदिर येथे संपन्न झाली.या कीर्तनातूनही त्यांनी पर्यावरणा रक्षणाविषयी आपले विचार मांडले. वृक्षदाई प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
आपले नम्र,
वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देह.