भाचीचं झाड…..!

मंगळवार दि. २८ जानेवारी २०२५
द. ह. कवठेकर प्रशाला, पंढरपूर….
भाचीचं झाड…..
सकाळी. सकाळी.. कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सरांना फोन केला व काही महिन्यापूर्वी शाळेच्या प्रांगणात लावलेल्या झाडांची सरांना विचारपूस केली. पर्यावरणाशी नाते जोडणाऱ्या कुलकर्णी सरांनी आपण प्रत्यक्ष येऊनच झाडाची पाहणी करावी म्हणून मला शाळेतच बोलावलं…
शाळेच्या प्रांगणात व शाळे शेजारील रस्त्या जवळ निसर्गप्रेमी ग्रुप व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या माध्यमातून लावलेल्या झाडांची कुलकर्णी सरांसोबत पाहणी केली. मैदानामध्ये बोचऱ्या थंडीतल्या कोवळ्या उन्हामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी जगदीश खेबुडकर, ग दि माडगूळकर, वि दा सावरकर, प्र के अत्रे, सुरेश भट यांच्या कवितांचं संगीत वाद्याच्या तालामध्ये सामूहिक गायन करत होते.

काट्यामधली फुले हासुनी म्हणती काय आम्हाला
दुःख आपल्या मनात ठेवुनी वाटा सौख्य जगाला
उन्हे साहूनी पिंपळ देतो छायेचे वरदान….
छान छान छान आमचा बाग किती छान…

कवी यशवंत देव यांच्या कवितेतील ओळी कानावर पडताच.. मला माझ्या शाळेतील बालपणाची आठवण आली.
कविता गायनाचा कार्यक्रम संपल्यानंतर कुलकर्णी सरांनी मुला मुलींना माझी ओळख करून देऊन मला विनंती केली… महाराज.. मुलांसमोर पर्यावरणाचे दोन शब्द बोलता का ?

विषय पर्यावरणाचा असल्यामुळे मी मुलांशी संवाद साधण्यास तयार झालो.
मुलांना व मुलींना पर्यावरणाचे गांभीर्य सांगताना मी म्हणालो… पन्नास वर्षांपूर्वी आम्ही इंद्रायणी नदीवरून डोक्यावर हांडे घेऊन पाणी पिण्यासाठी घरी आणत होतो. जल प्रदूषणामुळे आज तुम्ही चंद्रभागेचं पाणी पिऊ शकता का ?
नाही… तुमची आई रोज सकाळी तुमच्या सॅगमध्ये शुद्ध पाण्याची बॉटल ठेवते. जल प्रदूषणाबरोबर स्वदेशी वृक्षांची ही कत्तल राजरोसपणे चालू आहे. भविष्यात आपण स्वदेशी वृक्ष संवर्धनावर लक्ष दिलं नाही… तर….कदाचित येणाऱ्या दहा वीस वर्षातच तुम्हाला तुमच्या मुलांच्या सॅगमध्ये शुद्ध पाण्याच्या बॉटल बरोबर ऑक्सिजनची ही बॉटल ठेवावी लागेल ! म्हणून गांभीर्याने विचार करा ! भविष्यातील पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही प्रत्येक जणी “ग्रेटा थनबर्ग” झाल्या पाहिजेत. कोण आहे ग्रेटा थनबर्ग ?
स्वीडन मध्ये २१ व्या शतकात म्हणजेच ३ जानेवारी २००३ मध्ये जनमलेली ग्रेटा थनबर्ग वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी पर्यावरणावर भाष्य करणारी कार्यकर्ती म्हणून जगासमोर आली. पर्यावरण या विषयाची लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रथम आपल्या आई-वडिलांमध्ये पर्यावरणा विषयी जागृती निर्माण करून, एका शुक्रवारी ती स्वीडनच्या संसदेसमोर विरोध प्रदर्शन करायला आली. व तिच्या विरोध प्रदर्शनाने जागतिक नेत्यांना तिने मांडलेल्या विषयाची दखल घ्यावी लागली. आणि त्या चिमुरडीच्या प्रेरणेने प्रभावित होऊन स्वीडनमधील लाखो विद्यार्थी आज तिच्याबरोबर दर शुक्रवारी (फ्रायडे फॉर फीचर) पर्यावरणा विषयी विरोध प्रदर्शन करायला बाहेर पडतात…….!

तुम्हीही तुमच्या निरोगी निरामय आयुष्यासाठी व उज्वल भविष्यासाठी “ग्रेटा थनबर्ग” बना ! व आपल्या आई-वडिलांना व मामाला पत्र लिहून पर्यावरणाविषयी जागृत करा, त्यांना आवाहन करा ! मामा ! माझ्या भविष्यासाठी एक तरी स्वदेशी झाड लाव ना ?